९ जुलैचा संप --
बी एस एन एल मधे एकजूट आणि संघर्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात....!
-बी एस एन एल मधे VRS लागू केल्यानंतर, कामगारांची आणि अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. संघटनांचे सभासद कमी झाले. आवश्यक तिथे नोकरभरती न करता सरसकट सर्व सेवा कंत्राटदारांना देण्यात आल्या. सोबतीला स्वयंचलित नवी यंत्रसामग्री होतीच. याचा एकत्रित परिणाम असा झाला की कामगारांची न्युसंस व्हॅल्यू घटली. यात आणखी भर म्हणजे अधिकारी कर्मचारी यांच्या एकजुटीचा AUAB या नावाने जो जॉइंट फोरम कार्यरत होता तो हळूहळू निष्क्रिय आणि निष्प्रभ झाला. या पार्श्वभूमीवर आपसातील मतभेद आणि भाबडी आशा उरी बाळगून अधिकारी संघटनेचा मोठा विभाग सरकारी संघटनेच्या आश्रयाला गेला. त्यामुळे अन्याय, भेदभाव आणि व्यवस्थापनाची मनमानी वाढली असली तरी संयुक्त आंदोलने मात्र थंडावली. तिसरा वेतन करार मिळेल की नाही अशा शंका सर्वांनाच ग्रासू लागली. सर्वत्र एक प्रकारची निराशा, मरगळ आणि उदासीनता यांचे साम्राज्य पसरले.
वर्षाला पाच संप करणाऱ्या बी एस एन एल कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे २०२० नंतर म्हणजे गेल्या पाच वर्षात एकही संप केला नाही. फुटकळ आंदोलने झाली पण व्यवस्थापनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या सर्व परिस्थितीचा अर्थ व्यवस्थापनाने असा घेतला की आता संघटना संपल्या,
बी एस एन एल संघटना मुक्त झाले. आपण या कर्मचाऱ्यांना आता कसेही वागवले तरी काहीच बिघडणार नाही अशा समजुतीत आणि तोऱ्यात वरिष्ठ अधिकारी वावरू लागले. वेज कमिटीच्या बैठका कोणत्याच निर्णयाविना पुढे पुढे ढकलल्या जावू लागल्या. स्तागणेशन मुळे वार्षिक वेतनवाढ न मिळणारा कर्मचारी मनात संताप असला तरी हताशपण अनुभवू लागला. आज होईल, उद्या होईल म्हणून आठ वर्षे झाली तरी वेतन करार मिळत नाही हे पाहून निराश होवू लागला. आणि या बॅकग्राऊंड वर BSNLEU & NFTE ने संयुक्तपणे ९ जुलैच्या संपाची नोटीस दिली. संपाची भूमिका आणि मागण्या याबाबत सर्व नेत्यांनी पुढाकार घेऊन आवश्यक ती माहिती सर्वापर्यंत पोहोचवली.
२ जुलैची निदर्शने, पत्रके, बॅनर इत्यादी माध्यमातून प्रचार प्रसार झाला व सुरवातीला तटस्थ आणि अलिप्त वाटणारा कर्मचारी सर्व ठिकाणी सक्रिय होवू लागला. जाणीव जागृतीने पुन्हा नवी भरारी घेतली. संपामधे अधिकारी का नाहीत, पगार कटेल का..? अँक्शन होईल का असा कोणताच प्रश्न सुध्दा कुणी विचारला नाही एवढी मनाची तयारी झाली. कामगारांची सुस्ती आणि व्यवस्थापनाची मस्ती घालवण्यासाठी हा संप सर्वांना आपलासा वाटू लागला.
BSNLEU / NFTE च्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सभासदांनी एकदिलाने, एकजीवाने हा संप लढवला. सर्वांनी साथ दिली. कोल्हापूर सांगली मधे १००% तर कल्याण,नागपूर, नांदेड अकोला चंद्रपूर अशा अनेक ठिकाणी ९०/९५% कर्मचाऱ्यांनी संपात उतरून आपली लढण्याची मानसिकता दाखवून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले..
एक दिवसाच्या संपाने सर्व प्रश्न मार्गी लागतील या भ्रमात कुणीच नाही, पण या संपाने एक संदेश मात्र नक्की दिला आहे की,
बी एस एन एल मधे कामगार चळवळ जिवंत आहे....! आणि
बी एस एन एल कर्मचारी यापुढे अन्याय आणि भेदभाव सहन करणार नाही..!
बी एस एन एल मधे एकजुटीचे आणि संघर्षाचे नवे पर्व निर्माण करण्याचा मान या ९ जुलैच्या संपालाच जाईल यात कोणतीच शंका नाही.
एक अपेक्षा मात्र आहे ती वरिष्ठ नेतृत्वाकडून. आपापले इगो बाजूला सारून, अधिकारी कर्मचारी संघटनांची तातडीची बैठक बोलवा. एकजुटीने पुढील दिशा ठरवा. बेमुदत बंदचा आदेश दिला तरी तो आम्ही पूर्ण शक्तिनिशी यशस्वी करू. पण ITS अधिकाऱ्यांना आठवा वेतन आयोग आणि आमच्या नशिबी स्तागणेशन हे आता अजिबात चालू देता कामा नये. तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, त्याला विलंब करू नये हे व्यवस्थापनाला ठणकावून सांगा.
बी एस एन एल कर्मचाऱ्यांच्या पेन्शनर्स असोसिएशनने AIBDPA ने सुध्दा संपाला पाठिंबा दिला, सभेला उपस्थित राहून मनोबल वाढवले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
अधिकारी वर्गातील अनेक सन्माननीय व्यक्तींनी संप यशस्वी व्हावा म्हणून शुभेच्छा दिल्या, पाठिंबादर्शक भावना व्यक्त केल्या त्यांनाही मनःपुर्वक धन्यवाद.
काहीं अधिकारी तर एवढे भारावून गेलेले दिसले की त्यांना पाठिंबा व्यक्त करायला शब्द सुध्दा सापडले नाही. असे अव्यक्त प्रेम आणि सद्भावना बाळगणाऱ्या सर्वांना विशेष धन्यवाद.
विशेष म्हणजे एक दिवसाचा पगार कापला जाईल हे माहिती असूनही जे सन्माननीय BSNLEU / NFTE युनियन चे सभासद बंधू भगिनी यांचे विशेष आभार/ धन्यवाद.
९ जुलैचा संप महाराष्ट्र सर्कल मध्ये यशस्वी केल्याबद्दल दोन्ही युनियन चे जिल्हा सचिव, सर्कल पदाधिकारी, कार्यकर्ते , सभासद, कॉम्रेडस् चे महाराष्ट्र परिमंडळ च्या वतिने मनःपुर्वक धन्यवाद/ जाहिर आभार, क्रांतीकारी लाल सलाम!
आपले विश्वासू
कॉ .कौतिक बस्ते CS BSNLEU MH Circle
कॉ. रंजन दानी CS NFTE BSNL MH Circle.